17.3 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

धनंजय मुंडेंची बीडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती..

धनंजय मुंडेंची बीडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती..

जिल्हयातील रखडलेली कामे तातडीने मार्गी लागतील का ?

बीड प्रतिनिधी – अखेर बीडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. आज बीड जिल्ह्याचे भविष्य हे धनंजय मुंडे यांच्या हातात आहे. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होऊन सत्तांतर झाले. यानंतर शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. दरम्यान, भाजपचे औरंगाबाद येथील नेते अतुल सावे यांच्याकडे बीड आणि जालना या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कारभार सोपवण्यात आला. मागील वर्षभरात विविध कारणांमुळे सावे हे चांगलेच वादग्रस्त ठरले होते. विशेष करून निधी वाटपात त्यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना कोट्यावधीचा निधी दिल्याचा आरोप झाला. टक्केवारी घेऊन ते निधी वाटप करत असल्याचेही आरोप त्यांच्यावर झाले. तसेच अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अतुल सावे फिरकलेच नाहीत. यामुळे पालकमंत्री हटावची मागणीही झाली.

 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू असलेल्या धनंजय मुंडे यांना कृषी खात्याचे मंत्रीपद मिळाले. मुंडे मंत्री झाले तरी त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. अतुल सावेच बीडचे पालकमंत्री असल्याने निर्णय घेताना अनेक अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे सावे हे फारसे बीडकडे फिरकतही नव्हते. यामुळे धनंजय मुंडे यांची पालकमंत्री पदी वर्णी लागावी, अशी मागणी जोर धरत होती. अखेर पालकमंत्री पदाचा तेढ सुटला असून बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे. हक्काचा पालकमंत्री मिळाल्यामुळे आता रखडलेली कामे तातडीने मार्गी लागतील, असा विश्‍वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!