“बदलत्या काळातील उच्च शिक्षण आणि करियर च्या नव्या संधी विषयी मार्गदर्शन करण्या साठी एकलव्य तर्फे तेलगाव येथे निवासी शिबिराचे आयोजन”
गितांजली लव्हाळे वानखडे वडवणी प्रतिनिधी :-
देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत योगदान निश्चित करणे ही काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचे तरुण मनुष्यबळ सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे पण दर्जेदार उच्च शिक्षणा अभावी मोठा तरुण वर्ग आजही रोजगाराच्या संधी पासून मुकावला आहे. उच्च शिक्षणासाठी जी काही थोडीफार चांगली विद्यापीठे वा संस्था आहे तिथे ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांचा टक्का कमी आहे.
ग्रामीण भागात आज शिक्षणाचा प्रसार झाला असला तरी दर्जेदार उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बरेच विद्यार्थी वंचित आहेत. पदवी पर्यंत चे शिक्षण गाव किंवा निम शहरी पातळीवरून झाल्या मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या या वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता खूप आहे, जिद्द आणि मेहनत घ्यायची तयारी सुद्धा आहे. परंतु संधींबद्दल माहिती कमी आहे आणि योग्य दृष्टीकोनाचा अभाव आहे. एकलव्य च्या या कार्यशाळा या सर्व समस्यांवर मात करत मार्ग काढण्यात पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात.
आपल्या जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक १ ते ३ सप्टेंबर दरम्यान बदलत्या काळातील उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावर या विषयावर निवासी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर डेव्हलपमेंट सेंटर, मानवी हक्क अभियान, तेलगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड येथे पार पडणार आहे.
या शिबिरात देशातील नामांकित विद्यापीठांत शिकणारे विद्यार्थी जसे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बंगलोर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, आयआयटी, आयआयएम शिबिरार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात गांधी फेलोशिप, टीच फॉर इंडिया फेलोशीप, गुंज फेलोशिप, नीती आयोग अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट फेलोशिप, एस बी आय युथ फॉर इंडिया फेलोशिप अशा प्रतिष्ठीत फेलोशिप विषयी सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे.
एकलव्य इंडिया फाउंडेशन तर्फे उच्च शिक्षण आणि करीयर विषयी जनजागृती, मेंटोरिंग आणि कोचिंग कार्यक्रम राबवले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाच्या आणि करिअरच्या पर्यायी संधी विषयी माहिती देण्यासाठी आणि त्याबद्दल जाणीव, जागृती करून शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगळेगळ्या भागात निवासी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ग्रामीण आणि विशेषतः पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार्यशाळा घेतली जाते. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमधून शिकलेल्या मेंटोर द्वारे सतत मार्गदर्शन केले जाते. या प्रयत्नांतून आतपर्यंत १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी तसेच प्रतिष्ठीत फेलोशिप मध्ये प्रवेश मिळवला आहे. नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवल्या नंतर हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत नोकरी करत असून उल्लेखनीय काम करत आहेत.
सदर कार्यशाळेसाठी मराठवाडयातील जास्तीत तरुणांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या करिअरला नवीन दिशा द्यावी. असे आवाहन एकलव्य चे संस्थापक अध्यक्ष राजु केंद्र यांनी केले आहे. नोंदणी साठी +91 70832 31732 या क्रमांकावर संपर्क करावा.