केज तालुक्यात विहीर मंजुरीसाठी लाच मागणारा सरपंच एसीबीच्या जाळ्यात..
- केज तालुक्यात विहीर मंजुरीसाठी लाच मागणारा सरपंच एसीबीच्या जाळ्यात..
- केज प्रतिनिधी – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (नरेगा) विहीर मंजुरीसाठी लाचखोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव प्रताप खेडकर यांना 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना धाराशिव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.नरेगाअंतर्गत जलसिंचन विहिरी मंजूर करून त्यावर बीडीओंसह संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या घेण्यासाठी सरपंचाने तक्रारदाराकडे आर्थिक मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदाराने 23 डिसेंबर 2025 रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.तक्रारीनुसार तक्रारदार व अन्य तीन शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी विहिरी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी 25 हजार रुपये, असा एकूण 1 लाख रुपयांचा खर्च मागण्यात आला होता. एसीबीने पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत सरपंच खेडकर यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रुपये आणि उर्वरित तिघांकडून प्रत्येकी 20 हजार रुपये, अशी एकूण 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पहिल्या सापळा कारवाईत आरोपीने थेट रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, मंगळवारी (दि.13) केज पंचायत समितीच्या पाठीमागील खेडकर यांच्या खोलीत एसीबीने दुसरी सापळा कारवाई करत 70 हजार रुपये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी सरकारतर्फे पोलिस निरीक्षक विजय हनुमंत वगरे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान कवडे करीत आहेत.या कारवाईमुळे नरेगा योजनेतील भ्रष्टाचाराचा आणखी एक चेहरा समोर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!