घड्याळ सोडून कमळ की नवीन कळप? क्षीरसागरांच्या निर्णयाकडे बीडकरांचे डोळे..
बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. योगेश क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केल्यानंतर बीडच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ लागले आहे. अचानक केलेल्या या घोषणेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील सुरू असलेल्या एकतर्फी निर्णयप्रक्रियेबद्दल आणि स्थानिक पातळीवर स्वतःकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याबद्दल डॉ. क्षीरसागर नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बीड नगरपालिकेची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या हाती देण्यात आली आणि त्यानंतर क्षीरसागर सारख्या अनेक वर्ष बीड नगरपालिकेची सत्ता असणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना मागे टाकण्यात आल्याची भावना त्यांच्या मनात दाटली. याच नाराजीचा परिपाक म्हणून अखेर त्यांनी पक्षाला “सोडचिट्टी” दिली.
आता पुढचा मोठा प्रश्न : क्षीरसागर कुठे जाणार? बीडमध्ये सध्या चर्चेला एकच मुद्दा – डॉ. योगेश क्षीरसागर पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार? सूत्रांच्या माहितीनुसार ते भाजपच्या वाटेवर गंभीरपणे विचार करत आहेत. काही स्थानिक नेते आणि बीडच्या राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार लवकरच ते कमळाचा झेंडा हाती घेऊ शकतात अशी शक्यता जोर धरत आहे. दुसरीकडे, काहीजणांचा दावा आहे की ते जनता विकास आघाडी कडूनही बीड नगरपालिका निवडणूक लढवण्याचा पर्याय उघडा ठेवून आहेत. त्यामुळे त्यांचा आगामी निर्णय बीडचे राजकारण बदलणारा ठरू शकतो.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले महत्त्व निकट येणाऱ्या बीड नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागर यांचा कोणत्या बाजूने सहभाग असेल,
यावर संपूर्ण राजकारणाचे समीकरण बदलू शकते. अनेक वर्षांपासून क्षीरसागर घराण्याकडे बीड नगरपालिकेची सत्ता आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडून जाणारा स्थानिक स्तरावरील मजबूत चेहरा म्हणजे मतांचे मोठे हालचाल. त्यामुळे,
कमळ? की जनता विकास आघाडी? या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


