पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना पंधरा दिवसाचा अल्टीमेटम जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा इशारा
बीड प्रतिनिधी – गत हंगामामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या हाताला फार काही लागले नाही. शेतकरी अडचणीमध्ये आहे. येणार्या हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी पीक कर्जाच्या प्रतिक्षेत आहे. बँकांचे उंबरठे झिजवत आहे. पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकाचा निरूत्साह आहे. पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वच बँकांना पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देत आहोत. पंधरा दिवसात शेतकर्यांचे पीक कर्ज वाटप न झाल्यास बँकांच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, यंदा शेतकरी अडचणीत आहे. खरिप आणि रब्बी हंगामाची वाताहत झाली. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कुटुंब जगवण्यासाठी झालेले नुकसान आणि दुर्घटना बाजूला सारून शेतकर्याला पेरते व्हावे लागत आहे. यंदाचा हंगाम तरी चांगलं काही देवून जाईल या हिशोबाने शेतकरी खरिप हंगामाची जुळवाजुळव करत आहे. बी बियाणे खतासाठी बँकाकडे पीक कर्जाची मागणी करत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकासहित सर्वच बँका पीक कर्ज वाटप करण्यामध्ये निरूत्साही असल्याचे दिसत आहे. पीक कर्जासाठी शेतकर्यांना बँकांचे उंबरठे झिझवावे लागत आहे. बँकांनी कर्ज न दिल्यास खासगी सावकाराचा आधार शेतकर्यांना घ्यावा लागणार आहे आणि त्यापायी आहे ती जमिन घालवावी लागणार आहे. बीड जिल्ह्यातील बँकांना प्रशासनाने जे उद्दिष्ट दिले आहे. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देत आहोत. पुढील पंधरा दिवसात मागेल त्या शेतकर्याला पीक कर्ज न दिल्यास शिवसेना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्या बँकासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहे असा इशारा अनिल जगताप यांनी दिला आहे.