शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमात शासकीय योजनाच्या लाभांचे लाभार्थ्यांना होणार थेट वितरण-जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे
- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमात शासकीय योजनाच्या लाभांचे लाभार्थ्यांना होणार थेट वितरण-जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,३ : शासन आपल्या दारी हा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. या अंतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ, प्रमाणपत्र, शासकीय दाखले यांचे जिल्ह्यातील 75 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमात यातील 3000 लाभार्थ्यांना पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात थेट वितरण केले जाईल,असे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी डॉ दयानंद जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ज्ञानोबा मोकाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रियंका पाटील यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.
- जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे पुढे म्हणाल्या, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिनांक व ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येणार आहे या अनुषंगाने सोपविण्यात आलेले जबाबदारी संबंधित विभागांनी व अधिकाऱ्यांनी पूर्ण करावी. शासकीय विभाग व कार्यालय निहाय देण्यात येणाऱ्या लाभाची व लाभार्थ्यांची संख्या व इतर माहिती एकत्रित करण्यात यावी असे यावेळी म्हणाल्या.
- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शासन आपल्या दारी या उपक्रमास प्राधान्य देण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांकडून मोठ्या प्रमाणात काम केले जात असून जवळपास 84 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिले जातील यामध्ये विहिरी, शेततळे, घरकुल , ऊसतोड कामगार ओळखपत्र अशा अनेक बाबींचा समावेश आहे. यासाठी सर्व देण्यात येत असलेल्या लाभांची माहिती एकत्रित केली जात असून ती शासनाला सादर करण्यात येईल असे श्री पवार म्हणाले.
- याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री यादव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाच्या दृष्टीने पूर्व तयारी बाबत शासकीय विभागांना सूचना दिल्या. उपजिल्हाधिकारी डॉ. जगताप व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मोकाटे यांनी उपक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या पूर्व तयारी बाबत माहिती दिली.
- या अनुषंगाने 1 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत विविध शासकीय कार्यालयात पात्र अर्जदार व लाभार्थ्यांना संबंधित लाभ घेण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच विविध विभागांचा वतीने होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला यामध्ये प्रत्यक्षात देण्यात येणाऱ्या लाभांची संख्या अथवा दाखले प्रमाणपत्र यांची आकडेवारी याबाबत माहिती घेण्यात आली.
- जिल्हास्तरावरील कार्यक्रम भव्य स्वरूपात होणार असून यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देताना प्रत्येक तालुक्यातील लाभार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतानाच विविध विभागांचे लाभ देण्यासाठी प्रतिनिधिक लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर बोलाविण्यात येणार आहे पण उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या तालुक्यात व गावातच थेट त्यांच्यापर्यंत लाभ व प्रमाणपत्र पोहोचविण्यात येणार आहेत. 15 जून पर्यंत जिल्ह्यात याबाबत कार्यक्रम अंमलबजावणी होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलाविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व लाभ वितरण होण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या वतीने स्टॉल उभारण्यात येतील.
error: Content is protected !!