16.2 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत सरपंचाने शेतकऱ्यांसाठी मागितला न्याय; व्हिडिओ चर्चेत..!

  • दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत सरपंचाने शेतकऱ्यांसाठी मागितला न्याय; व्हिडिओ चर्चेत..!
  • शेतकऱ्यांना लाचेची मागणी; सरपंचाने गटविकास अधिकारी कार्यालयाबाहेर नोटांची उधळण करत केला निषेध..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) दि,31: तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आज दुपारी बारा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपयांची उधळण करीत अनोखे आंदोलन केले. पंचायत समितीमध्ये दाखल विहिरीचा प्रस्ताव मंजूर करताना 12 टक्के रक्कम मागितली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला. तीच रक्कम मी येथे घेऊन आलो आहे. आणखी रक्कम लागली तर शेतकऱ्यांसोबत जमा करून देतो, असा संतापही यावेळी सरपंच साबळे यांनी केला.
  • पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक राज आहे. गेल्या काही महिन्यांपासून कार्यालयात शेतकऱ्यांना सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, पाणंद रस्ता अशा कामांच्या मंजुरीसाठी टक्केवारी ठरलेली आहे. या टक्केवारीने शेतकऱ्याची आर्थिक लूट केली जात आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत परिणामी शेतकरी भरडला जात आहे. विहिरी प्रस्ताव मंजुरीसाठी देखील शेतकऱ्यांकडे १२ टक्के कमिशन मागण्यात आले आहे, असा आरोप गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला. यामुळे संतापलेल्या सरपंच साबळे यांनी पंचायत समिती समोर गळ्यात रोकडचा हार घालत आंदोलन केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागणारे पैसे मी आणले आहेत, असे म्हणत साबळे यांनी कार्यालाबाहेर नोटां भिरकावल्या. तब्बल २ लाख रुपये उधळत पंचायत समितीचा कारभार साबळे यांनी चव्हाट्यावर आणला. आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांकडून आणखी पैसे लागत असतील तर जमा करून आणून देतो, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी साबळे यांनी दिली. दरम्यान, जवळच उभ्या असलेल्या काही मुलांनी नोटा उचलून पळ काढला. तर कार्यालय बाहेर काही नोटा पडलेल्या दिसून आल्या. याचा अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • नेमका प्रकार काय आहे ?
  • माझ्या गावात विहिरीचे 20 प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आणलेले 1 लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर पाठविले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून 12 टक्के प्रमाणे रक्कम देण्यास सांगितले. यामुळे आज २ लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो. पण त्यांनी पैसे घेतले नाहीत, अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिली.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!