6.4 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

थोरल्या भावाच्या निधनानंतर दिराने सावरला वहिनीचा संसार

थोरल्या भावाच्या निधनानंतर दिराने सावरला वहिनीचा संसार

आमखेल ता.साक्री आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दर्शन साक्री तालुक्यातील आमखेल येथील एका कुटुंबाने घडवले आहे. थोरल्या भावाच्या निधनानंतर कोलमडलेला संसार सावरण्यासाठी धाकटा भाऊ रवींद्र (सोनू) यांनी आपल्या वहिनीशी विवाह करून त्यांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले आहे.
बुधवारी (दि. 24) रोजी साक्री तालुक्यातील धनाई पुनाई माता मंदिरात हा मंगलमयी विवाह सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात संपन्न झाला.

कर्तव्याची जाणीव आणि धाडसी पाऊल

रवींद्र यांचे थोरले बंधू यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. पत्नी कविता वहिनी आणि दोन लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर होता. त्यातच एक मुलगा अपंग असल्याने त्याच्या संगोपनाची मोठी जबाबदारी होती. अशा कठीण प्रसंगी सोनू यांनी समाज काय म्हणेल याचा विचार न करता, केवळ कर्तव्यापोटी वहिनीचा हात धरून दोन्ही मुलांचे छत्र बनण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

कुटुंबाची भक्कम साथ; सुनेला मानले मुलगी

हा निर्णय केवळ रवींद्र यांचा नव्हता,तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने यात मोठेपण दाखवले. सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला सुनेऐवजी ‘मुलगी’ मानून तिला घरात सन्मानाने स्थान दिले. तसेच सोनू यांच्या दोन्ही विवाहित बहिणींनीही आपल्या भावाच्या या निर्णयाला खंबीर पाठिंबा देऊन समाजात भगिनीप्रेमाचा नवा आदर्श घालून दिला आहे.

समाजाला दिली नवी दिशा

ग्रामीण भागातून पुढे आलेला हा विचार जुन्या रूढी-परंपरांच्या बेड्या तोडणारा आहे. विशेषतः मराठा समाजात या सकारात्मक बदलाचे मोठ्या अभिमानाने स्वागत केले जात आहे. एका अपंग मुलाचा आणि निराधार झालेल्या कुटुंबाचा स्वीकार करून सोनू यांनी केवळ एक संसार सावरला नाही,तर माणुसकीचा धर्म हा सर्व धर्मांहून श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले आहे.

अभिनंदनाचा वर्षाव

रवींद्र (सोनू) कविता वहिनी आणि या निर्णयाला पाठबळ देणारे त्यांचे आई-वडील व बहिणी यांच्यावर संपूर्ण धुळे जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.आमखेल गावाची मान उंचावणारा हा विवाह खऱ्या अर्थाने समाजाला नवी दिशा देणारा ठरेल.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!