ऊसतोड कामगार : मुलांचे भविष्य कुठे हरवले?
रात्रीचे बारा वाजले होते…
कळंब कडून वापस येताना सारणी सांगवी गावामध्ये आमचे मित्र गफूर भाई यांना सोडवण्यासाठी मी आणि माझे मार्गदर्शक नितीन ताटे ( बप्पा ) आम्ही गावांमध्ये गेलो होतो, वापस येत असताना गाडी मधूनच फोटो काढले फोटो काढायचा कारण असं की बारा वाजेच्या दरम्यान असे चित्र पाहायला मिळते. ही चित्रे आमदार खासदारापर्यंत पोहोचावी हीच मनात इच्छा ठेवून टिपलेले हे छायाचित्र आहे. गाडीतून उतरून फोटो काढावा तर त्या ठिकाणचे कामगार फोटो काढून देणार नाहीत या उद्देशाने खाली उतरून फोटो काढला नाही पण त्यांच्या अंधाराच्या पडद्यामागे दिसत होती एक वेगळीच दुनिया. रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरचे लाईट लागलेले, आणि त्यात उसाचे ढीग भरत असलेले काही चेहरे थकलेले, पण जगण्यासाठी लढणारे. ते ऊसतोड कामगार होते.दिवस रात्र न पाहता, उन्हातान्हात, पावसात आणि थंडीतही ते घाम गाळतात. प्रत्येक उसाच्या कांड्यामागे त्यांचा एक तुकडा आयुष्याचा मिसळलेला असतो.
पण मला निम्म्या रात्री प्रश्न असा पडला की त्या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे काय?
आजही हजारो ऊसतोड कुटुंबं आपला संसार हातातल्या हत्यारांवर म्हणजेच कोयत्यावर चालवतात. कामाच्या मागे मुलांचे शिक्षण, त्यांचे बालपण, आणि त्यांचे स्वप्न साखरेप्रमाणे विरघळून जातात. शाळा बंद, वही रिकामी, आणि भविष्यात फक्त उसाचा ढीग उरतो. एखाद्या ऊसतोड मजुरांचा एका उसाच्या कांड्यामध्ये मुलाचं भविष्य लपलेलं असतं. आई ऊसतोड कामगार करतात मग गावाकडे राहायचं कुठे हा प्रश्न सतवत असतो यामुळे आई-बाबा बरोबर जाऊन तिकडेच मन रमून जातं. एखाद्या आई-बाबाला विचाराव तर आईचे उत्तर ——–
“साहेब, आमचं मूल शाळेत गेलं तर खायचं कोण? आणि आम्ही कामाला गेलो नाही तर जगायचं कसं?”
ही वाक्यं कानावर पडली की मन पिळवटून जातं. कारण ती आई आपल्या लेकरासाठी जगते, पण तेच लेकरं शिक्षणापासून वंचित राहतात. आजही ऊसतोडीच्या शिबिरात जन्म घेणारे कित्येक लहानगे शाळा कधी पाहतच नाहीत. त्यांच्या हातात पेनऐवजी हत्यार येतं. शिक्षकाऐवजी ‘मुकादम’ हा त्यांचा गुरू बनतो. सरकारच्या योजनांच्या पानांवर त्यांचं भविष्य लिहिलं गेलं आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या पायातली बेडी कोणी तोडली नाही. जे ऊस गाळण्यासाठी जातात, त्यांचा स्वतःचा गाळलेला काळ कोणी पाहत नाही. आपण मध्यरात्री आरामात झोपतो, पण त्याच वेळी कुणीतरी उसाच्या शेतात काम करत असतो. त्यांचा घाम आपल्या चहात साखरेप्रमाणे मिसळलेला असतो पण त्याची किंमत मात्र त्यांना मिळत नाही. आज गरज आहे ती फक्त दया नाही तर न्याय आणि संधीची.
त्यांच्या लेकरांना शाळेत नेणं, शिक्षण देणं, आणि ऊसाच्या कांड्यांऐवजी पेन हातात देणं हीच खरी सेवा, हीच खरी समाजकारणाची परीक्षा..
ऊसतोड कामगाराच्या लेकराचं बालपण जपलं, तरच उद्याचं भविष्य उजळेल.”
– अभिजीत पवार
( दैनिक बीड माऊली संपादक )
मो. 9373956727


