लोणगाव कॅम्प चौकात ऊसाने भरलेली टाली उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली
प्रतिनिधी : लक्ष्मण घायतिडक
दि: 29 ऑगस्ट माजलगाव तालुक्यातील लोणगाव कॅम्प चौकात आज सायंकाळी ऊसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली (टाली) अपघातग्रस्त झाली. रस्त्यावरील खोल खड्ड्यामुळे तोल जाऊन ट्रॉली उलटली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लोणगाव शिवारातील शेतकरी ऊस घेऊन जवळच्या साखर कारखान्याकडे निघाले होते. लोणगाव कॅम्प चौकात पोहोचताच रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॉलीचे चाक अडकल्याने वाहनाचा तोल गेला आणि ऊसाने भरलेली टाली रस्त्याच्या कडेला उलटली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर चालकाला मदत केली. सुदैवाने संध्याकाळ असल्याने अपघाताच्या वेळी चौकात मोठी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत असून, त्यांनी लोणगाव ते माजलगाव मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था तातडीने सुधारावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. वारंवार होणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्याच्या हंगामामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


