महादेव जानकारांच्या गळाला लागलेला मासा निघाला सावकार ?
रासप जिल्हाध्यक्ष मतकर याच्यावर गुन्हा दाखल..
बीड प्रतिनिधी – शहरातील स्वामी विवेकानंदनगर, ग्रामसेवक कॉलनी येथे राहणाऱ्या रासप जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब संपतराव मतकर यांच्याविरोधात महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला.
अण्णासाहेब मतकर याच्याकडे आता सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आहे. अण्णासाहेब मतकर हे महादेव जानकर यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यासाठी महादेव जानकर यांच्या गळाला लागलेला मासा सावकार निघाल्याच्या चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहे.
पाटोदा येथील सहायक निबंधक कार्यालयातील सतीश बेटकर यांनी याबाबत बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संदीपान रामकिसन ढोरमारे (रा. तळेगाव, ता.जि. बीड) यांनी याप्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
चौकशीदरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात मारुती मतकर यांनी ढोरमारे यांच्याकडून २७ लाख रुपये घेऊन त्यावर पाच टक्के व्याजासह एकूण ३१ लाख पाच हजार रुपये परत दिल्याचा उल्लेख असलेले १०० रुपयांच्या मुद्रांकावरील नोटरीचे हमीपत्र आढळून आले.
हे हमीपत्र मार्च २०२१ मध्ये नोटरीकृत करण्यात आले असून, त्यामध्ये स्पष्टपणे व्याजाचा उल्लेख आहे. मात्र, या दोघांकडेही सावकारी परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे हा व्यवहार अवैध सावकारी प्रकारात मोडतो, असे जिल्हा निबंधक यांच्या चौकशी अहवालात नमूद आहे.
या अहवालाच्या आधारे उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सतीश लक्ष्मणराव बेटकर यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.