धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यात घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेत आहे. केवळ सात महिन्यांच्या चिमुरडीचा चॉकलेट घशात अडकल्याने मृत्यू झाला. मृत बालिकेचं नाव आरोही आनंद खोड असं असून, तिच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोही घरात खेळत असताना जमिनीवर पडलेले चॉकलेट तिने उचलून तोंडात टाकले. चॉकलेट घशात अडकल्यामुळे तिला श्वास घेता येईनासा झाला. अचानक गुदमरल्याने ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी आरडाओरड करत तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यावर चिमुरडीला मृत घोषित करण्यात आलं. त्यामुळे खोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अवघ्या सात महिन्यांची मुलगी अशा प्रकारे दगावल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. निरागस आरोहीच्या मृत्यूने वातावरण शोकमग्न झालं आहे. शेजारी, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला असला तरी तिच्या जाण्याचं दुःख साऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे.
दरम्यान या घटनेतून महत्त्वाचा इशारा मिळतो. लहान मुलं घरात रांगत-खेळत असताना जमिनीवर पडलेल्या छोट्या वस्तू, खाण्याचे पदार्थ, प्लास्टिकचे तुकडे, नाणी यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अनेक वेळा अशा वस्तू तोंडात गेल्याने गुदमरून मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. डॉक्टरांनी , पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवणं आणि त्यांच्या आवाक्यात अशा वस्तू न ठेवणं हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. आरोहीच्या दुर्दैवी मृत्यूने बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा पालकांना अधिक जागरूक राहण्याची जाणीव करून दिली आहे.


