10 हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात
विहिरीचा लाभ देण्यासाठी स्वीकारली लाच..
बीड प्रतिनिधी – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील जलसिंचन विहीर मंजूर करून लाभार्थी यादीत प्रस्ताव देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेताना तालुक्यातील किट्टी आडगाव येथील सरपंच रुख्मानंद सदानंद खेत्रे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील पथकाने शुक्रवारी गजाआड केले.
तालुक्यातील किट्टी आडगाव येथील एक शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधील सरकारी अनुदानावरील विहिरी आपल्या आईच्या नावे मिळावी यासाठी प्रयत्नशील होता. त्याला सरपंच रुख्मानंद खेत्रे याने तुला विहीर मी मिळवून देतो, गावच्या यादीत नाव टाकून मंजुरीसाठी इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण २० हजार रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर पडताळणी करून शुक्रवारी दुपारी माजलगावातील गजानननगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचला. या वेळी २० हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोनि. राहुलकुमार भोळ, समाधान कवडे यांनी केली.