12 वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळाल्या ; पुन्हा परीक्षा होणार का ?
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणाव..
शिक्षिकेच्या घराला आग, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य खाक; शिक्षणमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय..
निवासी संपादक | दिपक वाघमारे
मुंबई प्रतिनिधी :विरारमध्ये शिक्षिकेच्या घराला आग लागली. या आगीमध्ये बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. या घटनेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यातच आता शिक्षिकेविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.१२वीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच परीक्षा दिली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षिकेने आपल्या घरी नेल्या होत्या. पण अचानक शिक्षिकेच्या घराला आग लागली. यामध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका देखील जळून खाक झाल्या. संपूर्ण उत्तरपत्रिकेचा गठ्ठा जळू खाक झाला. ही घटना १० मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे. उत्तर पत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासने बंधनकारक असताना देखील शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्याच कशा असा प्रश्न विचारला जात आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिक्षिकेविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.दादा भुसे यांनी सांगितले की, ‘बारावी कॉमर्सच्या या १७५ उत्तर पत्रिका आहेत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या होत्या. त्याचे मार्क्स शाळा/कॉलेजकडे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. उत्तर पत्रिका घरी नेणे आणि ज्यांनी त्या घरी घेऊन जाऊ दिल्या, ज्यांच्या घरी जळाल्या त्यांच्यावर कारवाई होईल. याप्रकरणाची चौकशी होईल.’