हळदी कुंकू संक्रातीचं वाण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान
- हळदी कुंकू संक्रातीचं वाण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान
- सध्याच्या इंग्रजी शाळांच्या स्पर्धेच्या वातावरणात मराठी शाळा कशा गुणवत्तापूर्ण आहेत. शिवाय शाळा मधून विद्यार्थ्यांचा कसा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडून येतो आहे. हे दाखवण्यासाठी या नि अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. कारण इंग्रजी शाळेत लेकरांना घालण्याचा पुरुषापेक्षा स्त्री वर्गाचा हट्ट जास्त आहे. शिवाय अशा माता पालक संघाच्या निमित्ताच्या आयोजनातून त्यांचे प्रबोधन समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी शाळेत विद्यार्थी अष्टपैलू घडण्याच्या दृष्टीने शिक्षण दिलं जातं याची मार्केटिंग करण्यात आम्ही कमी पडत आहोत. तिकडे इंग्रजी शाळा शासनाच्या कोणत्याच परिपत्रकाचा विचार न करता आताच्या नवीन फळीच्या महिला पालकांच्या मनाचे समाधान होण्यासाठी विदयार्थ्यांच्या ऐवजी महिला पालकांच्या स्पर्धा घेतात. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून महिला पालकांना स्वतः ला सिद्ध करण्यासाठी एक सुवर्णसंधी देतात. महिला पालकांच्या संपर्कात जास्तीत जास्त राहून प्रथम सत्रात नवरात्र महोत्सव दांडिया, श्रावण पंचमी, तर द्वितीय सत्रात साऊ ते जिजाऊ सप्ताह,हळदी कुंकू नव्हे तर महिला दिन, गॅदरिंग आयोजनाने शाळा व पालकांची नाळ घट्ट करण्यात पुढे असतात.म्हणून सध्याच्या स्पर्धेच्या ग्रामीण भागातीलच काय शहरी भागातील महिलांच्या मनाचे राज शैक्षणिक क्षेत्रात चालू आहे. म्हणून मराठी शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी शासकीय परिपत्रकांना फाटा देऊन आयोजन करावे लागत आहेत. तेंव्हा असे उपक्रम आयोजित करून यातूनही शैक्षणिक उठाव निधी गोळा ही होतो. त्यामुळे आपला मूळ उद्देश साध्य होण्यासाठी हळदी कुंकू निमित्त मात्र करून माता पालक संघाची बैठक घेऊन विद्यार्थी गुणवत्ता संवर्धन वाढीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं अतिशय चांगलं. यातून गाव आणि शाळा यांचा समन्वय साधून शाळा सिद्धिस हात भार लागण्यास नक्कीच मदत होईल.विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील समन्वय साधून नेमकं वास्तव सुज्ञ पालकांसमोर विषद करणं गरजेचं आहे. जरी इंग्रजीशिवाय तरणोपाय नसला तरी ती फक्त इंग्रजी शाळेतूनच शिकवली जातेय असं म्हणणं चूक आहे. ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळेत अनुवादीत -भाषातरांची पद्धत अध्यापली जाते. यातून ज्या मूळ संबोध -संकल्पना किंवा अध्ययन अनुभूती ह्या इंग्रजी या मूळ भाषेतून न देता उगीचच पुतना मावशीचा पान्हा फोडून हिंदी सारख्या किंवा जिलेबी हिंदी मराठी इंग्रजी मधून दिल्या जातात हे एक शल्य आहे नव्हे शोकांतिका आहे. पण हे वास्तव कटू सत्य पालकांना समजून सांगणे गरजेचे आहे. कारण मातृभाषेतील शिक्षण हे विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात कोणत्याही विपरीत परिस्थितीशी सामना करतांना कसं प्रभावी नि परिणामकारक ठरू शकतं हे पटवून देण्याची आज नितांत गरज आहे. म्हणजेच इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत आपण मार्केटिंग करण्यात मराठी शाळांचा टक्का कमी पडतो आहे. समाज शाळा पालक शिक्षक यांच्यातील आंतरक्रिया तदवतच समन्वय वाढला पाहिजे. एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे. अशा पालक शिक्षक अथवा माता पालक शिक्षक संघाच्या व्यापक नि वारंवार होण्याऱ्या विचार मंथनातून इंग्रजी शाळाचं भूत मानगुटूवरून उतरलं पाहिजे. वास्तव परिस्थिती काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे. इंग्रजी शाळाचं खूळ डोक्यातून काढण्यासाठी पालक समाज संपर्क वाढवण्याची आवश्यकता आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. मराठी शाळांमधून तर इयत्ता पहिली पासून इंग्रजी विषयांचे अध्ययन अध्यापन केलं जातं आहे. मग नेमक्या महिला पालक वर्गाच्या अपेक्षा काय आहेत. फक्त टापटीप सुटाबूटात लेकरू स्कुल बस मध्ये बसून गावातून गेलं म्हणजे शिक्षण नव्हे ही खुळचट आभासी कल्पना डोक्यातून निघाली पाहिजे. मराठी शाळेच्या शिक्षणाचा दर्जा हा परागकोटींचा आहे. मराठी शाळेतील विद्यार्थी नि इंग्रजी शाळेतील विद्यार्थी यांचा झंगड पकड सामना किमान गावागावातून लागला पाहिजे. जशी कोंबड्याची झुंजी लावून पैज लावल्या जातात तशा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या पैंजा -शर्यती चॅलेंज लावल्या पाहिजेत. म्हणजे नेमकं कळेल कीं किसमे कितना हैं दम. दूध का दूध और पाणी का पाणी होणं गरजेचं आहे. वेळ कोणालाही माफ करत नाही. वेळीच काळाची सावध होऊन पावलं उचलली पाहिजेत. मराठी शाळेतील शिक्षक हा विविध स्पर्धा परीक्षा -कसोट्या -चाळण्यातुन तावून सुलाखून शासनाच्या प्रत्येक भट्टीतून होरपळून निघालेला असतो याउलट इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिका ही आपल्याच लेकरांना शिशुवर्गात सोडवायला गेल्यावर गल्ली बोळातील त्या इंग्रजी वाल्या शाळेच्या व्यवस्थापनाने येता का उद्यापासून म्हणून रोजनदारी वर नियुक्त करुन हम करे सो कायदा और नौकरी दिलेली असते. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणारं तेंव्हा हक्काने जिल्हा परिषदेच्या शाळेत विशेषतः महिला पालकांनी जाणं गरजेचं आहे. येथील नव्या शैक्षणिक धोरणाचा थोडा का होईना मागोवा घेऊन आपल्या भावी भविष्याचा अचूक वेध घेऊन त्याला कोणत्या शिक्षण प्रवाहात टाकले पाहिजे याचा उहापोह झाला पाहिजे. जो आपला वारस दिवटा ज्याच्या साठी आपण रात्रनंदिवस काबाड कष्ट करून राब राबत आहात त्या लेकरांचा शिक्षणाचा सातबारा इंग्रजी शिक्षणामुळे कोरा राहील याचा परामर्ष घेतलाच पाहिजे. एकंदरीत विद्यार्थी गुणवत्ता वृद्धिंगत- संवर्धन- वाढीसाठी एकोप्याने साकल्याने यत्न होणे काळाची गरज आहे.
- श्री आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
- _स्तंभलेखक तथा शिक्षक_
- मो-9403725973
error: Content is protected !!