१५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीची तिघांवर कारवाई ; दोन ताब्यात तर एक फरार.
- १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीची तिघांवर कारवाई ; दोन ताब्यात तर एक फरार.
- 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे
- बीड प्रतिनिधी:- कार्यालयीन कामकाजाच्या पोर्टलवर आलेल्या ऑनलाईन प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी नगर रचना कार्यालय, बीड येथील प्रभारी नगर रचनाकार प्रशांत डोंगरे याने ३० हजारांची लाच तक्रारदार अशोक काळकुटे यांच्याकडे मागितली होती. तडजोडीअंती १५ हजार रूपयांची लाच खासगी अभियंत्याकडे देण्यास सांगितले होते. याप्रकरणी दोन खासगी अभियंत्यांना एसीबीने दि.२२ मे रोजी पकडले आहे. तसेच नगररचनाकार डोंगरे हा झाला फरार आहे. या तिघांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात अशोक वसंतराव काळकुटे यांच्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम-७, ७अ, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- आरोपी प्रशांत शिवाजी डोंगरे (वय २९ रा. चऱ्हाटा फाटा, बीड) हा सहायक नगर रचनाकार असून त्याच्याकडे नगररचनाकार या पदाचा अतिरिक्त पदभार होता. तसेच निलेश सोपान पवार (वय २९, रा. आंतरवली बुद्रुक ता. गेवराई) हा अभियंता त्याचा मदतनीस असून शेख नेहाल शेख अब्दुल गणी (वय ३० रा. शहंशाह नगर, बीड) हा अभियंता आहे. तक्रारदार अशोक काळकुटे यांच्या आई मोहराबाई वसंत काळकुटे यांच्या नावावरील येळंब (घाट) शिवारातील गट क्रमांक ५८० अ (१) मधील २०.५० आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज बी.पी.एम.एस या पोर्टलवर निलेश पवार याच्या मार्फत दाखल केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी तो नगर रचना कार्यालयात पाठविला होता. २६ मार्च २०२४ रोजी निलेश पवार याने प्रशांत डोंगरे याच्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. २ एप्रिल रोजी याची पंचासमक्ष खात्री करण्यात आली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी प्रशांत डोंगरेने देखील लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर डोंगरे यांच्याशी झालेल्या तडजोडीअंती १५ हजार रूपयांची लाच शेख नेहाल याच्याकडे देण्यास सांगितली. याप्रकरणी निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेतले आहे तर प्रशांत डोंगरे हा फरार आहे.
- या तिघांविरोधातही बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रारदार अशोक वसंतराव काळकुटे यांच्या फिर्यादीवरून दि.२२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, हनुमान गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, गणेश मेहेत्रे आदींनी केली आहे.
- चौकट-
- तक्रार मागे घेण्यासाठी आमिष दाखवून दबाव आणला-अशोक काळकुटे.

- माझे काम प्रलंबित ठेवल्याने आणि वारंवार पैशाची मागणी केल्याने मी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली यानंतर याची एसीबीने खात्री केली. खात्री झाल्यानंतर प्रशांत डोंगरे यांना सोबत असलेल्या पंचाचा संशय आल्याने माझी माहिती काढली. यापुर्वी मी लाचखोर अधिकाऱ्याच्या विरोधात केलेल्या तक्रारीची आणि सामाजिक आंदोलनांची माहिती त्यांना मिळाली. यामुळे त्यांच्या विरोधात मी तक्रार केल्याचा संशय आला.
- यानंतर त्यांनी मला काही लोकांच्या माध्यमातून आमिष दाखवले तर राजकीय आणि समाजातील काही लोकांकडून दबाव आणून तक्रार मागे घेण्यासाठीचा प्रयत्न केला. मात्र याला माझ्यासह लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठल्याच आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता हि कारवाई पार पाडली.
- बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यालयात अशा लाचखोर अधिकाऱ्यांकडुन सर्रास आर्थिक लुट केली जात आहे. प्रत्येक कामाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. याचे आता फक्त जाहिर फलक लावणे उरले आहे. यामुळे अशा लाचखोर अधिकाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लोकांनी लाच मागणाऱ्या लोकसेवकाची तक्रार करण्याची आवश्यकता आहे. तर आणि तरच लाचखोरीच्या विळख्यात सापडलेला हा बीड जिल्हा मोकळा श्वास घेऊ शकेल अन्यथा सामान्यांचे प्रचंड हाल आणि आर्थिक लुट होत राहिल. अशी प्रतिक्रिया तक्रारदार अशोक काळकुटे यांनी दिली आहे.
error: Content is protected !!