सरपंच परिषदेच्या कार्यशाळेसाठी बीड जिल्ह्यातील हजारो सरपंचांची हजेरी..!
- सरपंच परिषदेच्या कार्यशाळेसाठी बीड जिल्ह्यातील हजारो सरपंचांची हजेरी..!
- पद्मश्री पोपटराव पवार, अजित पवार, दत्ता काकडे यांची विशेष उपस्थिती..
- सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष एडवोकेट राज पाटील यांचे सुंदर नियोजन..
- वडवणी प्रतिनिधी – सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणि जि. प. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जिल्हा सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या सरपंच परिषदेसाठी बीड जिल्ह्यातील हजारो सरपंच, उपसरपंचांची उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह खचाखच भरले होते. पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांची या परिषदेसाठी विशेष उपस्थिती होती.
- संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचांचे प्रश्न हाताशी घेऊन मागील काही वर्षापासून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही संघटना राज्यभर काम करत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली ही संघटना पद्मभूषण समाजसेवक अण्णा हजारे तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांना आदर्श मानून काम करत आहे. महाराष्ट्रात सरपंचांच्या माध्यमातून गावाचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास साध्य करण्यासाठी प्रशासनानेही मदत केली पाहिजे या भावनेतून ही संघटना मोठ्या जिद्दीने काम करत आहे. बीड जिल्ह्यातील सरपंचांचे संघटन आणखी मजबूत व्हावेत, सरपंचांचे प्रश्न सुटावेत आणि गावाचा विकास व्हावा या उद्देशाने बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सरपंचांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी केवळ वर्तमानपत्रातील बातम्या वाचून बीड जिल्ह्यातील हजारो सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित झाले होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अगदी तुडुंब भरले होते. या कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड विकास जाधव, पत्रकार वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस, ग्रामविकासातील अभ्यासक शरद बुट्टे पाटील तर अधिकारी श्री वासुदेव सोळंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोकाटे, पंचायत राज विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप काकडे, सामान्य प्रशासन विभाग उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुंढे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष राज पाटील आणि बीड जिल्ह्यातील त्यांच्या टीमने या कार्यशाळेचे उत्तम तयारी केली होती. सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना अहोरात्र परिश्रम घेईल असा आशावाद यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
- इ. जी. एस. चा फायदा घेतला तर इतर योजनेची गरज नाही-पोपटराव पवार
- इ.जी. एस. मार्फत रस्ते, विहिरी, गोठे, शेतीचे कामे अशी विविध कामे करता येतात. सुमारे तीन-तीन कोटी रुपयेची कामे करणारी काही ग्रामपंचायती आहेत. देशामध्ये दोनच घटक असंघटित आहेत. एक म्हणजे ग्राम व्यवस्थेतील सरपंच आणि शेतकरी. या देशांमध्ये बहुतेक केंद्र, राज्य, जिल्हा विभागीय, जिल्हा स्तरावरील यंत्रणा ग्राम विकास आणि कृषीसाठी काम करत असल्या तरी राज्यातील ६० टक्के कार्यालय आठ आठ दिवस, महिना महिना उघडतच नाहीत अशी खंत बोलून दाखवून आजही ग्रामपंचायतीच दप्तर पिशवीतच फिरत असल्याचे परखड मत पोपटराव पवार यांनी बोलून दाखवले. मात्र कधीही हिवरे बाजारला या आमची रविवारी देखील ग्रामपंचायत उघडी दिसेल असेही त्यांनी सांगितले.
- माजा बीड जिल्हा हा कमी नाही-अजीत पवार
- राष्ट्रीय लेवलचे पाच पुरस्कार बीड जिल्ह्याने जिंकले आहेत. मी इथे आलो तेव्हा काम चालू नव्हतं. आता हा जिल्हा इजीएसमध्ये महाराष्ट्रात नंबर एक वर आहे. ३००० किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ऑर्डर दिली आहे. बाराशे किलोमीटर रस्ता तयार झाला आहे. ४००० गोठे, बावीस हजार विहीरी सुरू आहेत. सरपंच हा काय शिपाई नाही तो गावाचा राजा आहे. गावात विरोधक असलाच पाहिजे. १८०० कोटी रुपयांच्या कामावर सह्या केल्या. शंभर रुपये जर घेतले असतील तर राजीनामा देईन. असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी व्यक्त केले.
- सरपंच पद प्रतिष्ठेचे आणि मानहानीचेही- दत्ता काकडे
- गावचे सरपंच पद सांभाळणं सोपं काम नाही. गावात कितीही चांगले काम केले तरी काही लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. प्रत्येक कामामध्ये संशयाच्या दृष्टीने पाहिलं जाते. मात्र विरोधकांना आपण विरोध न करता आपण कामातून गावकऱ्यांचे मन जिंकले पाहिजे. कारण सरपंच जेवढं प्रतिष्ठेचे पद आहे तेवढेच ते मानहानीकारक पद आहे. अनेक कामात सरपंचाला मानहानी सहन करावी लागते. सरपंचाची प्रतिष्ठा टिकून राहावी यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र काम करीत असल्याची भावना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी व्यक्त केली.
- सरपंचांना सक्षम करणे हेच परिषदेचे काम- अँड. विकास जाधव
महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना सक्षमपणे काम करता यावं यासाठी त्यांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे असतं. अधिकाऱ्यासोबत योग्य संवाद साधून योजना खेचून आणल्या पाहिजेत आणि सरपंच जागृत असेल तर त्याला काम करणे सोपे जाईल. सरपंच सक्षम झाला तर तो काम चांगलं करेल यासाठी सरपंच परिषद काम करीत असल्याचे सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष एडवोकेट विकास जाधव यांनी यावेळी सांगितले.
- बीड जिल्ह्यातील सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील- अँड. राज पाटील
- बीड जिल्ह्यातील सर्व सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच परिषद काम करीत आहे. सरपंचांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी आपण काम करत राहू. सरपंचांनी प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक आणि गावकरी यांच्यामध्ये संवाद निर्माण केला पाहिजे. राजकारण्यापेक्षा गावाच्या विकासाला जास्त महत्त्व दिले पाहिजे असे मत सरपंच परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष एडवोकेट राज पाटील यांनी व्यक्त केले.
error: Content is protected !!